नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ – आ.जयकुमार गोरे
दहिवडी : एकनाथ वाघमोडे
खटाव तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या भागाचा पाहणी दौरा रविवारी भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हाध्यक्ष माण-खटावचे आ.जयकुमार गोरे यांनी केला. यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आवश्यक त्या सर्व मदतीसाठी शासनामार्फत सर्वस्तरावर प्रयत्न करण्यात येतील असे सांगितले.
सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील बोंबाळे, डांभेवाडी, कलेढोण,शिंगाडवाडी व इतर भागामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपिटीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून तेथील शेतकऱ्यांशी चर्चा केली. त्यांच्या समस्या व भावना जाणून घेतल्या. यावेळी शेतकऱ्यांच्या शेतातील द्राक्ष व इतर पिकांच्या झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष शेतात जावून पाहणी केली. झालेल्या नुकसानीचे पंचनामे तत्काळ करून घेण्याच्या सूचनाही जयकुमार गोरे यांनी यावेळी उपस्थित कृषी अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना म्हणाले की, अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या पिकांच्या व बागांच्या झालेल्या नुकसानीच्या मदतीसाठी शासनाकडे अहवाल सादर करण्यात येणार आहे. याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चेद्वारे सकारात्मक निर्णय त्वरीत घेण्यात येतील, अशी माहीती त्यांनी यावेळी दिली.
या पाहणी दौऱ्यात सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, प्रांताधिकारी शैलेश सुर्यवंशी, तहसिलदार किरण जमदाडे,तालुका कृषी अधिकारी,यांच्यासह संबधित विभागाचे अधिकारी,भाजपा खटाव तालुकाध्यक्ष धनंजय चव्हाण,कृष्णराव बनसोडे,सोमनाथ भोसले,निलेश कर्पे,श्रीकांत बनसोडे,रवींद्र काळे, विक्रमशेठ रोमन,डांभेवाडीचे सरपंच किशोर बागल ,कलेढोणच्या सरपंच प्रीती शेटे ,व इतर सर्व नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते.