सोशल मीडियावर हत्यारांचे स्टेटस ठेवणे युवकाला पडले महागात
भांडवली,ता. माण येथील एकावर गुन्हा दाखल
दहिवडी / एकनाथ वाघमोडे
व्हाट्सअप व इंस्टाग्राम वर तलवार, कोयते, सूरी असल्या घातक हत्यारांचा व्हिडिओ ठेवणे भांडवली ता. माण येथील युवकाला चांगलेच महागात पडले असून दहिवडी पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल झाला असून प्रतीक शंकर नामदास वय 18 असे संशयित युवकाचे नाव आहे.
दहिवडी पोलीस ठाण्यातून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, प्रतीक शंकर नामदास हा व्हाट्सअप व इंस्टाग्रामवर तलवार व कोयत्या सारख्या घातक हत्यारांचे व्हिडिओ व्हायरल करत असल्याने पोलिसांनी त्याच्यावरती लक्ष ठेवून त्याच्या राहत्या घरी छापा मारला असता त्याच्या घरातून दोन तलवारी, एक कोयता व सूरी अशी घातक हत्यारे मिळून आली. त्याच्याकडे पोलिसांनी या हत्यारा बाबत अधिक चौकशी केली असता त्याला समाधानकारक उत्तर न देता आल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल झाला असून गुन्ह्याची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल गणेश पवार यांनी दिली असून या कारवाईत दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, तात्यासाहेब ढोले, बापू खांडेकर, प्रमोद कदम, नेहा कोळेकर यांनी भाग घेतला होता पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल नेहा कोळेकर करीत आहेत.
माण व खटाव तालुक्यातील नागरिक व युवकांनी अशा प्रकारे घातक शस्त्रे स्वतः जवळ बाळगू नयेत तो कायद्याने गुन्हा असून युवकांनी लाईक्सच्या हव्यासापोटी सोशल मीडियावर असे व्हिडिओ टाकू नयेत अन्यथा आपल्यावर गुन्हा दाखल होऊन आपले संपूर्ण करिअर उध्वस्त होऊ शकते, तरी कोणीही अशी हत्यारे जवळ बाळगू नयेत. असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी केले आहे.