कोगनोळी नजिक अपघातात विद्यार्थिनीचा मृत्यू..
कोगनोळी ; राहुल मेस्त्री..
कोगनोळी ता निपाणी येथील पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गा लगत असलेल्या सेल टॅक्स नाक्याजवळ ट्रक व मोटरसायकल अपघातात एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार दि 21 रोजी सकाळी दहाच्या सुमारास घडली.
श्रेया हेमंतकुमार हरिज्वाळे (वय 15) राहणार कसबा सांगाव ता. कागल असे अपघातात मयत झालेल्या विद्यार्थिनीचे नाव असून ती इयत्ता नववीच्या वर्गामध्ये शिकत होती.
याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांच्या कडून मिळालेली अधिक माहिती अशी की, सांगाव येथून एक्टिवा मोटरसायकल क्रमांक केए 22 एचसी 8894 घेऊन मामा शशिधर एच एस व श्रेया हरिज्वाळे (कग्रांळी बेळगांव) येथे सुट्टीसाठी जात होती. येथील सेलटॅक्स नाक्यावर आले असता मालवाहू ट्रक क्रमांक टीएन 52 क्यु 4686 व एक्टिवा मोटरसायकल यांच्यात अपघात झाला. यामध्ये मामा शशीधर किरकोळ जखमी झाले. तर श्रेया हिच्या डोक्यावरून चाक गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
घटनास्थळी निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक प्रवीण गंगोळ, उपनिरीक्षक रमेश पोवार, एएसआय एस ए टोलगी, राजू गोरखनावर, एस एच काडगौडर यांनी भेट देऊन मृतदेह निपाणी येथील महात्मा गांधी रुग्णालयात शवच्छेदनासाठी पाठवला.