सुस्ते गावचे ग्रामदैवत श्रीअंबिका देवीच्या यात्रेस शुक्रवार पासून प्रारंभ
सुस्ते/चंद्रकांत माने
पंढरपूर तालुक्यातील सुस्ते गावचे ग्रामदैवत तथा जागृत देवस्थान म्हणून ओळख जाणाऱ्या श्री.अंबिका देवीच्या यात्रेस शुक्रवारी दि.5 रोजी वैशाख पौर्णिमे पासून मोठया उत्साहात प्रारंभ होणार आहे.दोन दिवस चालणाऱ्या या यात्रेनिमित्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती यात्रा कमिटीच्या वतीने देण्यात आली.
शुक्रवारी सकाळी 9 वाजता येथील मारुती मंदिरापासून ग्रामदैवत श्री अंबिका देवीला साडी-चोळीचा आहेर व नैवेद्य घेऊन जाण्यासाठी यात्रा कमिटी व ग्रामस्थ गावातील मारूतीच्या समोर एकत्रित येऊन अंबिकानगर येथील ग्रामदैवताच्या मंदिरापर्यंत वाजत- गाजत जाणार आहेत. सकाळी 10 वाजता ग्रामदैवताची महापूजा उद्योजक बाळासाहेब चव्हाण व त्यांच्या पत्नी रोहिणी चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. धार्मिक विधी पार पडल्यानंतर ग्रामदैवताची आरती होईल.त्यानंतर ग्रामदैवतास नैवेद्य दाखण्यास प्रारंभ होणार आहे.यावेळी आलेल्या भाविक भक्तांना महाप्रसाद देण्यात येणार आहे.सायंकाळी 6 वाजता संपूर्ण गावातुन ते मंदिरापर्यंत ग्रामदैवताचा छबिना व देवीच्या पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. यावेळी शोभेच्या दारूची आतषबाजी मोठ्या प्रमाणावर करण्यात येणार आहे. रात्री 8 वाजता ग्रामस्थांच्या मनोरंजनासाठी मृणाल कुलकर्णी निर्मित लावण्यखणी हा सदाबहार मराठमोळ्या लावणीचा दाखवण्यात येणार आहे.
शनिवारी दुपारी ४ वाजता जंगी कुस्त्यांचे भव्य मैदान भरवण्यात आले आहे. त्यानंतर रात्री 8 वाजता ग्रामस्थांच्या मनोरंजनासाठी मायबोली मराठी हा मराठमोळा कार्यक्रम दाखवण्यात येणार आहे. यात्रेमध्ये आयोजीत करण्यात आलेल्या सर्व कार्यक्रमाचा पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी लाभ घ्यावा, असे आवाहन यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे. यात्रेनिमित्त ग्रामदैवताच्या मंदिरावर आकर्षित अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील व मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली आहे. विद्युत पोलवर दिवे बसवण्यात आले आहेत. यात्राकाळात ग्रामस्थांची गैरसोय होऊ नये म्हणून दोन दिवस दिवसभर गावात पाणीपुरवठा सुरू राहणार असल्याची माहिती सरपंच कांताबाई रणदिवे यांनी दिली.