डॉ. श्रीकांत पाटील यांची कविता विद्यापीठ अभ्यासक्रमात

कोल्हापूर/डॉ.कृष्णदेव गिरी
घुणकी येथील साहित्यिक डॉ.श्रीकांत पाटील यांच्या काळ्या दगडावरची रेघ या कवितासंग्रहातील ‘काळ्या दगडावरची रेघ’ याच शीर्षक कवितेचा समावेश औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादच्या बी.ए., बी कॉम, बी.एससी, बी.एम. डब्ल्यू, बी.एफ.ए द्वितीय वर्ष या अभ्यासक्रमाच्या अभ्यासपत्रिका- ४ भारतीय भाषा मराठी पाठ्यपुस्तकात समावेश करण्यात आला आहे.
डॉ श्रीकांत पाटील हे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक असून त्यांना शिवाजी विद्यापीठाचे राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा पारितोषिक सुद्धा विद्यार्थी असताना मिळालेले आहे. ते दोन वेळा राज्य शासन साहित्य पुरस्काराने सन्मानित आहेत. त्यांनी ज्येष्ठांसाठी व बालकुमारांसाठी विपुल प्रमाणामध्ये साहित्य लेखन केलेले आहे.
लॉकडाऊन,ऊसकोंडी,पाणीफेरा या कादंबऱ्या रसिक श्रोते हो!, लिहू आनंदे,सुगम मराठी व्याकरण लेखन ही संपादने ,शब्दतरंग, माती आभाळाशी बोले, काळ्या दगडावरची रेघ हे कवितासंग्रह विचार वैभव हा स्फुट लेखसंग्रह, शाम कुरळे व्यक्ती आणि वाड् मय, के जी- एक सत्कार्य सेवावृत्ती, ज्ञानसूर्य ही चरित्रात्मक पुस्तके तर चला व्यासपीठावर आणि सूत्रसंचालन स्वरूप आणि संचित ही माहितीवजा आधारित साहित्याची पुस्तके, स्वातंत्र्योत्तर सामाजिक नाट्यसृष्टी हा संशोधन ग्रंथ, खडू फळा आणि मी हे आत्मकथन,ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.
त्यांनी बालकुमारांसाठी व्यासपीठ, चिमुकल्यांची भाषणे भाग- एक, चिमुकल्यांचे भाषणे भाग- दोन हे भाषण संग्रह, सुयश भाषणे हे संपादन, त्रिदल हा एकांकिका संग्रह, जयजयकार, तुतारी आणि संवेदना या एकांकिका, गाव शिवारातील फिनिक्स, जिगरबाज गोट्या, सिमेंटच्या जंगलात प्राण्यांचे सहल या बाल कादंबऱ्या झाडोरा हा बालकविता संग्रह, ज्ञानसंवर्धन मराठी व्याकरण इयत्ता नववी, इयत्ता दहावी असे लेखन केलेले आहे.
ते मराठी बालकुमार साहित्य सभेचे उपाध्यक्ष असून महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा वारणानगरचे कार्यवाह आहेत. मुख्याध्यापक संघाच्या मराठी विषय समितीचे सहसचिव आहेत. शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर जिल्हा जळगाव चे ते राज्य संपर्कप्रमुख आहेत. भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंडळ मुंबई चे सहसचिव अशा विविध पदावर ते आपले योगदान देत असून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात उस्मानाबाद व वर्धा येथे त्यांनी परिसंवादात वक्ता म्हणून सहभाग घेतलेला आहे. अनेक बाल कुमार किशोर युवा व ग्रामीण साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष परिसंवाद अध्यक्ष व सहभागी वक्ता, प्रकट मुलाखत अशा विविध भूमिका पार पाडलेल्या आहेत.
सध्या ते पेठवडगाव येथील बळवंतराव यादव विद्यालयांमध्ये मराठी विभाग प्रमुख म्हणून काम पाहत आहेत. त्यांना संस्थेचे अध्यक्ष माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ, उपाध्यक्षा विजयादेवी यादव, सचिवा विद्याताई पोळ, कार्यवाह अभिजीत गायकवाड, प्राचार्य अविनाश पाटील, पर्यवेक्षक मनीषा पोळ व पी. बी. पाटील यांचे प्रोत्साहन मिळाले.